... तरीही यांना झोप येत नाही. रात्री सुद्धा झोपेत शरद पवार – शरद पवार म्हणून ओरडत असतील.


लातुर। 
लातूर येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चा  कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार संबोधित करताना सांगीतले की जनतेवर अनेकदा संकट येत असतात. अशा संकटकाळी सरकारने लोकांना मदत करायची असते. कोल्हापूर, सांगली, कराड, कोकण व अन्य ठिकाणी अतिवृष्टीने महापूर आला. मी स्वतः तिथे गेलो. गावेच्या गावे वाहून गेली होती. घरात काहीच उरलेलं नव्हतं. ऊस, फळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. लोकांची दयनीय स्थिती झाली होती. मी तिथे बरेच दिवस ठाण मांडून राहिलो होतो. पण मुख्यमंत्री सांगलीत अर्धा तास थांबले. दुसऱ्या दिवशी त्यांनी हेलिकॉप्टरने पाहणी केली. लोकांना भेटून त्यांचे दु:ख पाहण्याऐवजी हवाई पाहणी करतात. संकटकाळात जे सरकार जनतेला मदत करत नाही अशा सरकारला निवडणुकीत त्यांची जागा दाखवायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 
सत्ता कशी राबवावी याचा सल्लाही पवार यांनी फडणवीसांना दिला. लातूरच्या भूकंपाच्या दिवशी गणपती विसर्जन होते. मी मुख्यमंत्री व गृहमंत्री होतो. शेवटचा गणपती बुडल्याशिवाय झोपायचं नाही हा माझी सवय. परभणीत गणपतीवरून वाद झाले होते. ते रात्री उशिरा मिटले. मग मी रात्री 3.30 वाजता झोपायला गेलो. पण माझ्या घराच्या खिडक्या, तावदाने हलली. मला भूकंपाची शंका आली. मी पावणेचार वाजता कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. तिथल्या अधिकाऱ्यांनी किल्लारीला भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे मला सांगितले. मी तातडीने विमानाची सोय केली. माझे सहकारी विलासराव देशमुख यांना सोबतीला घेतले. सहा वाजता मुंबई विमानतळावर पोचलो. सात वाजता मी लातूरमध्ये होतो. तिथली अवस्था भयावह होती. घरे पडलीत, रक्त सांडलेय. मृतदेह सगळीकडे विखुरलेले होते. आजूबाजुच्या सगळ्याच गावांत हेच चित्र होते. मग ठरवलं मुंबईला परत जायचं नाही.


सोलापूरहून रोज लातूर-उस्मानाबाद असा 15 दिवस प्रवास केला. लाखापेक्षा जास्त घरे पडली होती. आठ हजार पेक्षा जास्त मृत्यू झाले होते. एवढे मोठे संकट त्यापूर्वी महाराष्ट्रावर आलं नव्हतं. लोकांनी सत्ता दिली होती. ती चैनीसाठी नाही. लोकांच्या हितासाठी ही सत्ता होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या व देशाच्या जनतेने भरपूर मदत केली. सरकारच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या, वृत्तपत्र कंपन्या गावांच्या पुनर्विकासाची जबाबदारी वाटून दिली. भूंकपग्रस्तांचे यशस्वी पुनर्वसन त्यावेळी आम्ही करून दाखविले. सत्ता अशा कामासाठी वापरायची असते. नुसती हवाई पाहणीतून दाखवायची नसते. लोकांची घरंदारं पडल्यानंतर राज्यकर्त्यांनी अर्ध्या तासात त्या ठिकाणी येऊन परत जाण्याने प्रश्न सुटत नसतात. आजच्या राज्यकर्त्यांमध्ये लोकांबद्दल यत्किंचितही ओलावा नाही. का नाही कोल्हापूरकर, सांगली, सातारकरांच्या मदतीला गेले? राज्यात गडचिरोलीलाही महापूर आला होता. का नाही मुख्यमंत्री तातडीने तिथे पोचले? फक्त वृत्तपत्र आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावर कार्यवाही केली. ही अवस्था महाराष्ट्रात आहे. संकटग्रस्तांना मदत न करणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आहे. त्यामुळे येऊ घातलेली विधानसभा निवडणूक महत्वाची आहे. अशांना घरी बसवायचे काम तुम्हाला आणि मला करायचे आहे, असे पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.


मला निवडणुकीत व्यक्तिश: रस राहिलेला नाही. मी चौदा निवडणुका लढविल्या आहेत. सात वेळा विधानसभा, अन् सात वेळा लोकसभा-राज्यसभा. लोकांनी मला कधी पाडले नाही. चौदावेळा विजयी केलं. नवीन पिढी उभी करण्याचा प्रयत्न करतोय. तरूणांना संधी देतोय. खेडोपाड्यातील शिक्षित मुलं आहेत, त्यातून शोधून त्यांना उभे करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मी ठरवलंय स्वतः उभं राहायचं नाही. पण उद्याचा महाराष्ट्र योग्य लोकांच्या हाती द्यायची काळजी घेतोय. महाराष्ट्राचा लौकीक पुन्हा प्रस्थापित करण्याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे.
शेतकऱ्यांविषयी हे सरकार निर्दयी झाले आहे. काळ्या आईशी इमान राखणाऱ्या, निसर्गाच्या लहरीपणामुळे ज्या शेतकऱ्यांची थकबाकी झाली. त्यांच्या घरातील भांडी बाहेर काढायची. त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबवायचे, घरातील लग्न थांबवायचे, घरावर जप्ती आणायची असे प्रकार होत आहेत. मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना एका महिन्यात 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. आताचे सरकार असे निर्णय घ्यायला तयार नाही.
मुंबई – पुण्याचे वृत्तपत्र काढा. बँकांचे नुकसान भरून काढण्यासाठी 80 हजार रूपये भरण्याची भूमिका केंद्राने घेतली आहे. हे कर्ज दोन-चार एकरवाला थकवत नाही. मोठे उद्योजक थकवतात. ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकार पैसे भरत आहे. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आलं तर त्याला माफी नाही. केंद्राचे हे धोरण चुकीचे आहे. हे धोरण बदलायला हवे. आम्ही धोरणं बदलली. तुम्हीही बदला. मी कृषी मंत्री होण्याअगोदर परदेशातून धान्य आणावे लागत होते. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो. शेतीमालाच्या किमती वाढवल्या, कर्जमाफी दिल्या. जो देश-परदेशातून अन्न मागवत होता, त्याला पाच वर्षांत स्वयंपूर्ण बनविले. बहाद्दर शेतकऱ्यांनी इतकं धान्य पिकवलं की जगामध्ये गहू निर्यात करणारा भारत पहिल्या क्रमांकाचा देश ठरला. जगात दोन नंबरचा साखर व कापूस पिकवणारा देश ठरला. हे शेतकऱ्यांनी करून दाखवलं. म्हणून त्यांना त्यांची किंमत दिली पाहिजे. पण या सरकारला शेतकऱ्यांची यत्किंचित चिंता नाही. त्यामुळे तो आत्महत्या करू लागला आहे. 


ऑनलाईन कर्जमाफी. मोठी कर्जमाफी जाहीर झाली. पण 50 टक्के शेतकऱ्यांच्याही हातात कर्जमाफी पडली नाही. हा बळीराजा घाम गाळतो. त्याला संकटकाळात मदत न करणारा आणि त्याच्या घामाची किंमत न देणाऱ्या राज्यकर्त्याला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. 
पोट भरण्यासाठी पुण्या-मुंबईत भरपूर लोक येत असतात. पण आता अशा लोकांना रोजगार मिळत नाही. कारखाने, उद्योजक वाढले पाहिजेत. तरूणांना रोजगार दिले पाहिजे. नाशिकला उद्योग भरपूर आहेत. मी परवा तिथे गेलो होतो. तिथे 16 हजार कामगारांना नोकरीतून काढून टाकले आहे. हे ऐकून वाईट वाटले. महिंद्रा अण्ड महिंदा, बीएसएनल अशा अनेक कंपन्यांनी मंदीमुळे कामगारांना कामावरून काढून टाकले. तरुण बेकार झाले आहेत. मुख्यमंत्री सांगतात विकास केला. पण त्यांना माझा सवाल आहे, घाम गाळू इच्छिणाऱ्या तरूणांना नोकऱ्या द्या. त्यांना प्रपंच चालवता आला पाहिजे एवढा मोबदला द्या. लातूरमध्ये काही कारखाने बंद पडले आहेत. रोजगार गेला. विलासराव देशमुख सत्तेत होते. त्यांनी लातूरचा चेहरा बदलवला. एमआयडीसी आणली. लोकांना कामे दिली. पण आज लातूरमध्येही आज बेकारी वाढली असल्याची खंत आहे. 
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. नागपूरमध्ये सर्वाधिक गुन्हे घडत आहेत. मुख्यमंत्री नागपूरचे आहेत. नागपूर भारताची गुन्हे राजधानी बनली आहे. रस्त्याने जाणाऱ्या आई-बहिणींवर अत्याचार होतात. माझ्या गावांत असे झाले तर तेथील प्रतिनिधित्व करायला मला आवडणार नाही. पण हे लोकांनी मते तरी कशी मागतात. भाषण करताना अर्धा तास बोलतात. त्यातील 25 मिनिटे केवळ शरद पवार यांच्यावर टीका करण्यातच घालवतात. काय या लोकांची दैना झाली आहे. मी निवडणुकीला उभा राहत नाही. तरीही यांना झोप येत नाही. रात्री सुद्धा झोपेत शरद पवार – शरद पवार म्हणून ओरडत असतील. 
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान आहे. धनंजय मुंडे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व करतात. आता ते विधानसभेत जाणार आहेत. शिवरायांचा इतिहास ज्या किल्ल्यांमध्ये घडला तिथे हे दारूची दुकाने काढायला निघाले आहेत. आर. आर. पाटलांनी डान्सबार बंद केले होते. पण आताचे राज्यकर्ते किल्ल्यातून छमछम करायला इच्छूक आहेत.
नव्या पिढीला जिथे स्वाभिमानाचे धडे मिळतात. त्या जागेवर तुम्ही दारूचे बार आणि छमछमचे निर्णय घेता. शरम वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना. हा शिवबाचा महाराष्ट्र नाही. आज कुणी महाराष्ट्राला चुकीच्या रस्त्यावर नेत असेल तर त्या राज्यकर्त्यांना पुन्हा सत्तेतून खाली खेचायलाच पाहिजे. तरूणांना सोबत घेऊन शिवबाचा खरा महाराष्ट्र आम्ही घडवणार आहोत.
काही लोक गेले. मला त्याची चिंता नाही. लई गेलेले पाहिले. जायचे आहे त्यांना जाऊ द्या. नवी मुंबईत गेलो, नाशिकला गेलो, उस्मानाबादला गेलो, बीडला गेलो. हजारोच्या संख्येने लोक भेटत आहेत. सभांना मोठी गर्दी होत आहे. त्यात तरूणांची संख्या जास्त आहे. या तरूणांच्या मनगटात शक्ती आहे. त्यामुळे गेला त्याचा विचार करू नका. कोणत्याही पक्षाचा माझ्याकडे आला तरी मी त्याला मदत केली होती. त्यामुळे असे कुणी निघून गेले असतील तर त्याची मला चिंता नाही. मला आठवतं, 1980 साली माझे 58 आमदार निवडून आले होते. त्यापैकी 52 सोडून गेले. आम्ही अवघे सहाजण राहिलो होतो. दोन – तीन वर्षे पायाला भिंगरी लावून फिरलो. जे जे गेले त्यांना घरी बसवलं. तेव्हा चार वर्षे थांबावं लागलं होतं. आता एक महिना थांबावं लागेल.

Dhananjay Munde CMOMaharashtra #लातूर

Post a Comment

0 Comments