मराठवाडा ग्रीड योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होणार- पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

मराठवाडा ग्रीड योजनेमुळे लातूर जिल्हा कायमस्वरूपी टंचाईमुक्त होणार
                                                      - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर

* मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
* पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन
* पोलीस पथकाकडून हवेमध्ये बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना
* गणेश विसर्जनाचा “लातूर पॅटर्न ” निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव 



लातूर दि. 17:- संपूर्ण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला मान्यता दिलेली असून यात लातूर जिल्हयाचा समावेश आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात लातूर जिल्ह्यसह  संपूर्ण मराठवाड्याला पाणी उपलब्ध होणार आहे. व लातूर जिल्हा  ही कायमस्वरूपी टंचाईमुक्त होणार असल्याचे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण ,कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हुतात्मा स्मारक येथे पालकमंत्री निलंगेकर यांनी स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शुभेच्छा ध्वजवंदन करण्यात आले. त्या प्रसंगी पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे,   जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त एमडी सिंह, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर,अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक ,अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री निलंगेकर पुढे म्हणाले की ,भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद, काश्मीर व जुनागढ  संस्थानांतील जनता गुलामीतच होती. मराठवाडा निजामाच्या बंधनांतून मुक्त करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली  मोठे आंदोलन छेडले गेले त्यात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर होता.आपल्या  लातूर जिल्हयाचे ही त्या लढयात मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
      मराठवाडा मुक्ती संग्राम सतत 13 महिने सुरु होता व या लढयात अनेक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. निजाम शरण येण्यास तयार नव्हता त्यावेळी भारत सरकारने  पोलीस ॲक्शन सुरु केली. व शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जुलूमी राजवटीतून मुक्त् झाला. व लढयामुळे भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले. मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर मराठवाडयाची लातूर जिल्हयासह सर्वांगीण विकासाकडे वाटचाल सुरु  असून या विकासाला मराठवाडा मुक्ती संग्रामातील  थोर हुतात्म्यांच्या  बलिदानाची  ऊर्जा लाभली असल्याचे निलंगेकर यांनी म्हटले.
       पालकमंत्री निलंगेकर यांनी  या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक , वीरमाता, वीरपिता, वीर पत्नी यांची भेट घेऊन त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. तसेच ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, विद्यार्थी , पालक व पत्रकार या सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.
       प्रारंभी पालकमंत्री  निलंगकर यांनी स्मृती स्तंभाला पुष्पचक्र  अर्पण करुन हुतात्म्यांना  अभिवादन केले. त्यानंतर महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष  मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर व इतर मान्यवरांनी  स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर  पोलिस पथकाकडून  बंदुकीच्या तीन फैरी  हवेत झाडून  हुतात्म्यांना  मानवंदना देण्यात आली.  त्यानंतर पालकमंत्री  निलंगकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण  करण्यात आले. 
        यावेळी  पालकमंत्री निलंगकर यांच्या हस्ते गणेश विसर्जनाच्या  कामात उत्कृष्ट काम करुन  पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाची  भूमिका  बजावून लातूरचा एक वेगळा पॅटर्न निर्माण करणाऱ्या  जिल्हाधिकारी जी. श्रीकांत , मनपा आयुक्त एम.डी. सिंह , पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त  पोलिस अधिक्षक  हिंमत जाधव, पोलिस उप अधिक्षक  सचिन सांगळे, मनपा उपायुक्त  संभाजी वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव  करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वंजारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments