चला.... मतदान करू या..आपलं कर्तव्य बजावू या !!!




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2019


जगातील सर्वात मोठी  संसदीय लोकशाही असलेल्या आपल्या देशातील महाराष्ट्र राज्यात विधानसभेसाठी  मतदान प्रक्रिया पार पडत असून लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात दि.21 ऑक्टोबर  रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करता येणार आहे.
मतदान हे दान नसून आपलं कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी समजून या राष्ट्रीय कार्यात उत्साहात सहभागी होऊन हा राष्ट्रीय पर्व यशस्वी करावा. मतदानाच्या माध्यमातून आपण आपली लोकशाही बळकट करीत असतो. भारतीय निवडणूक आयोगामार्फत घेतली जाणारी ही निवडणूक निर्भय, निःपक्ष, पारदर्शक आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी प्रशासनास दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात  लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, उदगीर, निलंगा आणि औसा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली असून मतदारांनी  निर्भीडपणे, नि:संकोचपणे मतदानासाठी बाहेर पडावे आणि 100% मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.  
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्या मदतीला 18सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत. या निवडणूका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी 13 नोडल ऑफिसर, 8 प्रशासकीय अधिकारी विविध पथक प्रमुख म्हणून आपले कर्तव्य पार पाडतील. लातूर जिल्ह्यात 19 लक्ष 14 हजार 669 मतदारांची अधिकृत नोंद असून जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यात एकूण 2 हजार 13 मतदान केंद्रांमार्फत ही निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल. 
दिव्यांग मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक दिव्यांग विशेष मतदान केंद्र (सक्षम) असणार आहे.  निवडणूक प्रक्रियेत सहभागी दिव्यांग कर्मचाऱ्यांमार्फत हे विशेष मतदान केंद्र चालविले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी सुविधा पुरविल्या जाणार आहेत त्यांच्यासाठी शासकीय वाहनांची व्यवस्था देखील प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. महिला मतदारांचा मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग वाढावा, यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक सखी मतदान केंद्र असणार आहे या केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिला असतील. भारतीय लोकशाही अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या प्रशासनाच्या या प्रयत्नांना जनतेनेही उत्स्फूर्तपणे मतदान करून सहकार्य करावे, असे आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे. 
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. दर 5 वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीतून आपण आपला प्रतिनिधी विधानसभेत  पाठवीत असतो. निर्वाचित आमदार  हा आपल्या मतदारसंघातील लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारा असतो त्यामुळे हा प्रतिनिधी शिक्षित, चारित्र्यसंपन्न आणि सक्षम असावा. मतदारसंघातील मूलभूत समस्या, प्रश्न यांची जाण ठेऊन केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या योजना, नवनवीन उद्योगधंदे, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी आपल्या दुष्काळसदृश्य भागात कशा उपलब्ध करता येतील, यासाठी तत्परतेने कार्य करण्याची तयारी असणारा कार्यतत्पर प्रतिनिधी निवडून देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एक नागरिक आणि मतदार म्हणून आपल्यावर असते.  आपल्या मराठवाडयात मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सक्षम आणि कर्तबगार उमेदवाराला आपला प्रतिनिधी म्हणून संधी देऊन भारतीय लोकशाहीचा हा पर्व यशस्वी करून याला अधिक सक्षम आणि बळकट करू या.  कुठल्याही आमिषाला, प्रलोभनाला बळी न पडता सद्सदविवेकबुद्धीने आपला हक्क बजावावा. आपल्या संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार अनमोल आहे. त्याचा योग्य वापर देशहितासाठी, लोकशाहीच्या उज्वल भविष्यासाठी अर्थातच आपल्या सर्वांगीण विकासासाठी करू या, चला मतदान करू या आपलं कर्तव्य बजावू या!

                                                                                                                   सतीश तांदळे                                                                                                                             पत्रकार, लातूर                                                                                                  9822992032

Post a Comment

0 Comments